सांगली : साखर, इथेनॉल आणि जैवऊर्जा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित शुगर, इथेनॉल अँड बायोएनर्जी इंटरनॅशनल अवॉर्ड्स (SEIA) 2026 सोहळ्याचे मुंबईतील येथे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड साखर कारखान्याला ‘एससीआयए इंटरनॅशनल अॅवॉर्ड-२०२६’ मधील ‘सर्वोत्कृष्ट साखर पुरस्कार’ प्राप्त झाला. या पुरस्काराने कारखान्याच्या वाटचालीत आणखी एका मानाच्या पुरस्काराची भर पडली आहे.
देशातील ख्यातनाम ‘चिनी मंडी’ संस्थेतर्फे आयोजित या सोहळ्यात हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेतर्फे साखर व इथेनॉल उद्योगातील गुणवत्ता, उत्पादन क्षमता, तंत्रज्ञानाचा वापर आणि व्यवस्थापनातील उत्कृष्टतेसाठी हे आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. देशातील आघाडीच्या साखर कारखान्यांमध्ये या पुरस्काराला विशेष मान्यता आहे.
सहकार, गुणवत्ता आणि प्रगतीचा आदर्श ठरलेल्या कारखान्याला मिळालेला हा पुरस्कार केवळ कारखान्याचा नसून हजारो सभासद, शेतकरी व व्यवस्थापनाचा आहे, असे कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी सांगितले. ते म्हणाले की, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या सहकार तत्त्वज्ञानाचा वारसा जपत कारखाना सातत्याने प्रगतीची नवी शिखरे सर करत आहे. उत्कृष्ट दर्जाची साखर निर्मिती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, कार्यक्षम व्यवस्थापन आणि शेतकरी हिताला प्राधान्य देणारी धोरणे यामुळे हा बहुमान मिळाला आहे.
उद्योगातील नावीन्य आणि गुणवत्तेप्रती असलेली कटिबद्धता लक्षात घेऊन हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याचे त्यांनी नमूद केले. या यशाबद्दल कारखान्याचे संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी, कर्मचारी, सभासद शेतकरी, तसेच ऊस उत्पादक बांधवांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.


















