सांगली : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड साखर कारखान्याच्या ऊस विकास योजनेतून शेतकऱ्यांना ‘मॉइश्चर सेन्सर्स’ उपलब्ध करून दिले जाणार आहेत. कारखान्यातर्फे आयोजित शेतकरी चर्चासत्रात कारखान्याचे मार्गदर्शक-संचालक, आमदार अरुण लाड यांनी ही घोषणा केली. ऊस शेतीत अनेकदा गरजेपेक्षा अधिक पाण्याचा वापर होत असल्याने जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा अवलंब केला असला, तरी पिकाला नेमके किती पाणी द्यावे, हे निश्चित करण्यात अडचणी येतात. अशा स्थितीत जमिनीतील ओलाव्याचे अचूक मोजमाप करून पीकवाढीच्या अवस्थेनुसार आवश्यक तेवढेच पाणी देण्याबाबत मार्गदर्शन करणारे ‘मॉइश्चर सैन्सर्स’ शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहेत असे आमदार लाड यांनी सांगितले.
आमदार लाड यांनी ऊस शेतीत काटेकोर पाणी व्यवस्थापन करून पाण्याची बचत आणि उत्पादनवाढ साध्य करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नांची गरज व्यक्त केली. शेतकऱ्यांना या सेन्सर्सचा पुरवठा करण्यासाठी कारखान्याने फायलो कंपनीशी करार केला आहे अशी माहिती त्यांनी दिली. परिसरातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी मनोजकुमार वेताळ यांनी शाश्वत ऊस उत्पादनासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण किती असावे याविषयी माहिती दिली. फायलो कंपनीचे विपणन व्यवस्थापक विशालकुमार मिरजे यांनी ‘मॉइश्चर सेन्सर्स’ची कार्यपद्धती, फायदे याविषयी मार्गदर्शन केले. पाणी बचत, योग्य सिंचन व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीसाठी हे तंत्रज्ञान प्रभावी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.


















