सांगली : एक ते ७ जून दरम्यान कझाकिस्तान येथे होणाऱ्या आशियाई डिफ कुस्ती स्पर्धेसाठी येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या क्रांती कुस्ती मार्गदर्शन संकुलातील मल्लाची निवड झाली आहे. भारतीय संघात ग्रीको रोमन व फ्री स्टाईल या दोन्ही प्रकारांत प्रणव पडूळकर यांची निवड झाली आहे. तर वाघोली येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सूरज सुनील माने यांनी दमदार खेळी करत रौप्य पदक पटकावले. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत प्रणव प्रशांत पवार यांनी १७ वर्षांखालील ११० किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवत देशात तृतीय क्रमांक मिळवला. या तिन्ही होतकरू, गुणवंत मल्लांचा एकत्रित सत्कार क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांच्या हस्ते करण्यात आला.
क्रांती कुस्ती मार्गदर्शन संकुलातील खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धांत उल्लेखनीय यश संपादन करत गुणवत्ता, जिद्दीचा ठसा उमटवला. कठोर सराव, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले. भविष्यात ‘क्रांती’चे मल्ल ऑलिम्पिकसाठी जावेत, या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी सांगितले. क्रांती कुस्ती मार्गदर्शन संकुलाच्या माध्यमातून अनेक खेळाडू घडत आहेत. भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करणारे मल्ल येथे तयार होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील कामगिरीबाबत सूरज माने याला दुचाकी प्रदान करण्यात आली. क्रांती कारखान्याचे माजी संचालक संदीप पवार, कुस्ती संकुलाचे व्यवस्थापक प्रीतम लाड, उपसरपंच किरण लाड, एन. आय. एस. प्रशिक्षक मेहबूब शेख आदी उपस्थित होते.


















