सांगली : राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्यावतीने राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आरआयटी) येथे शिक्षण घेणाऱ्या कारखान्याच्या सभासदांच्या १९१ विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी १५ लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचा धनादेश आरआयटीचे संचालक डॉ. पी. व्ही. कडोले आणि कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य आर. डी. सावंत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांना शिष्यवृत्तीची पत्रेही देण्यात आली. कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यावेळी प्रमुख उपस्थित होते. साखर कारखान्याच्या सभासदांच्या मुला-मुलींनी उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे, देश-विदेशात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवावा, यासाठी कारखान्याकडून सातत्याने प्रोत्साहन व आर्थिक पाठबळ दिले जाईल,” असा विश्वास अध्यक्ष पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी कारखान्याच्या वार्षिक सभेत सभासदांनी केलेल्या मागणीनुसार आरआयटीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना गेल्यावर्षीपासून पुन्हा सुरू करण्यात आली असल्याचे सांगितले. प्राचार्य आर. डी. सावंत आणि संचालक डॉ. पी. व्ही. कडोले यांनी शिक्षणसंस्थेच्या प्रगतीत साखर कारखान्याचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. प्रभारी कार्यकारी संचालक विजयराव मोरे यांनी कारखान्याच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. आरआयटी गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य प्रा. शामराव पाटील, कारखान्याचे सचिव डी. एम. पाटील, राजारामबापू बँकेचे संचालक संभाजी पाटील, अनिरुद्ध पाटील, दिलीप चौगुले, राजेंद्र मोहिते, संतोष पाटील, दिलीप पाटील, कैलास चव्हाण, महेश जंगम, कृष्णात पाटील उपस्थित होते.


















