सांगली : राज्य मंत्रिमंडळाने सहकारी साखर कारखान्यांसाठी सॉफ्ट लोनची योजना मंजूर केली आहे. राज्यातील एकूण १०२ सहकारी साखर कारखान्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून, सात वर्षांच्या कालावधीत सुमारे ७३८.५१ कोटी रुपयांचे व्याज अनुदान शासनाकडून दिले जाणार आहे. या कर्जावरील व्याजाचा भार राज्य शासन उचलणार असल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील नऊ सहकारी साखर कारखान्यांना १६८ कोटी ३३ लाख रुपयांचे ‘सॉफ्ट लोन’ मंजूर केले आहे. या कर्जाची परतफेड १ ऑक्टोबर २०२६ पासून सात वर्षांत करावी लागणार आहे. त्याच कालावधीसाठी शासनाकडून व्याज अनुदान दिले जाणार आहे. बँकांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत मंजूर व वितरित केलेली कर्ज रक्कम योजनेसाठी पात्र राहणार आहे.
साखर कारखान्यांना या निधीतून प्रामुख्याने २०२५-२६ हंगामातील थकीत एफआरपी शेतकऱ्यांना देण्यास, तसेच एफआरपीची थकबाकी नसलेल्या कारखान्यांना २०२६-२७ गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी निधी वापरता येईल. सांगली जिल्ह्यात क्रांती कुंडल कारखान्याला सर्वाधिक ३०.१४ कोटी, ‘सोनहिरा’ला २७.६१ कोटी, राजारामबापू (साखराळे) २३.८६ कोटी, हुतात्मा (वाळवा) १६.५१ कोटी, राजारामबापू (वाटेगाव) १६.४४ कोटी, मोहनराव शिंदे (आरग) १५.२५ कोटी, विश्वास (चिखली) १४.४३ कोटी, राजारामबापू (कारंदवाडी) १३.२२ कोटी आणि राजारामबापू (जत) १०.८७ कोटींचे कर्ज मिळेल. यामुळे कारखान्यांना आगामी गाळप हंगामासाठी आर्थिक नियोजन करण्यास मोठी मदत होणार आहे. याबाबत राजारामबापू साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक आर. डी. माहुली यांनी सांगितले की, या निर्णयामुळे सांगलीतील साखर कारखान्यांना एक प्रकारे ‘बूस्टर’च मिळणार आहे. थकीत एफआरपी भागविणे आणि आगामी गाळप हंगामासाठी आर्थिक नियोजन करणे अधिक सुलभ होणार आहे.


















