सांगली : प्रतिटन ५,००० रुपये ऊस दरासाठी ‘स्वाभिमानी’ने वाळव्यात ट्रॅक्टर वाहतूक रोखली

सांगली : वाळवा तालुक्यात ऊस दराच्या प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेत ट्रॅक्टर अडवून आंदोलन केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दराचा तोडगा निघेपर्यंत गळीत हंगाम सुरू करू नये, अशी सूचना एन. डी. शुगर प्रशासनाला यापूर्वीच केली होती. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून कारखाना सुरू ठेवण्यात आल्याने संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. ईश्वरपूर येथील वाघवाडी फाटा परिसरात ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर कार्यकर्त्यांनी रोखले. यावेळी काही ट्रॅक्टरच्या टायरमधील हवा सोडण्यात आली. तसेच ऊस वाहतूक करणारी वाहने थांबवत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

चालू गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ठोस भूमिका घेतली आहे. उसाला प्रतिटन ५,००० रुपये पहिली उचल मिळाल्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नाही, असा इशारा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला. त्यामुळे वाघवाडी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलनादरम्यान पाच ते सहा ट्रॅक्टरमधून सुरू असलेली भरलेल्या उसाची वाहतूक रोखण्यात आली. योग्य ऊस दर मिळाल्याशिवाय कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू करू दिला जाणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. उसाच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असून, त्याचा विचार करून शेतकऱ्यांना योग्य दर मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रतिटन ५,००० रुपये पहिली उचल देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here