सांगली : हुतात्मा साखर कारखान्यासमोर काही मंडळींनी व्यक्ती द्वेषातून आंदोलन सुरू केले आहे. या माध्यमातून कारखान्याचे संचालक, अधिकाऱ्यांना वारंवार अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. या लोकांची प्रतिष्ठा राखली जात नाही. शनिवारी (ता. २) सकाळी झालेली संचालक मंडळाची सभा पूर्णपणे नियमबाह्य पद्धतीने झाली आहे. दबाव टाकून या सभेत झालेले ठराव वैध नाहीत. ते कारखान्याच्या कामकाजात लागू होत नाहीत असे हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी सांगितले. हुतात्मा साखर कारखान्याचा हुतात्मा दूध संघ बनविण्याचा प्रयत्न काही असंतुष्ट घटक करीत आहेत,” असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी यांचे नाव न घेता पत्रकार परिषदेत वैभव नायकवडी म्हणाले, पूर्वी हुतात्मा दूध संघ प्रतिदिनी एक लाख लिटर दूध संकलन करत होता. आता संघाचे दैनंदिन संकलन २० हजार लिटरपर्यंत घसरले आहे. संघ उत्पादकांना वेळेत बिल देत नाही. स्थानिक कामगारांना काढून टाकले आहे. दूध संस्थांची देणी दिली जात नाहीत. कामगारांना वेळेवर पगार मिळत नाही. बँकांचे हप्ते वेळेवर परत जात नाहीत. हेच लोक आता साखर कारखाना चालवायला निघाले आहेत. त्यांची एकूण कार्यपद्धती पाहता कारखान्याचा दूध संघ व्हायला वेळ लागणार नाही.


















