सांगली: एकेकाळी हुतात्मा साखर कारखान्याने देशात उच्चांकी १३.५० टक्के साखर उतारा मिळवून आणि उसाला सर्वात जास्त दर देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आज तोच हुतात्मा कारखाना वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अण्णांचे ज्येष्ठ सुपुत्र किरण नायकवडी, नातू गौरव आणि केदार नायकवडी यांनी साखर संचालकांकडे, वैभव नायकवडी यांनी केलेली साखरपोती चोरी आणि आर्थिक कारभार याबाबत लेखी तक्रार दाखल केली होती. साखर चोरीचे चित्रण सादर केले. ते समाजमाध्यमातून सभासदांपर्यंत पोहोचवले. साखर संचालकांनी अचानक छापा मारून कारखान्याचे एक गोडावून सील केले. त्यामध्ये साखर भरलेले ५ ट्रकही बंद केले होते. काही गोडवूनमध्ये नोंद नसलेली साखर पोती सापडली होती, त्याचा अहवाल संबंधित अधिकारी यांनी दिला होता. आता सभासद, शेतकरी कारखान्यासमोर बेमुदत आंदोलन करीत आहेत.
विद्यमान अध्यक्ष वैभव नायकवडी यांच्या मनमानी कारभारामुळे हुतात्मा कारखाना देशात, राज्यात नव्हे, तर जिल्ह्यात सर्वात मागे पडला आहे, अशा आरोपांच्या तोफा त्यांच्याच घरातून दररोज डागल्या जात आहेत. वैभव नायकवडी यांनी मनमानी करत नागनाथअण्णांची ध्येय-धोरणे गुंडाळून ठेवली. केवळ पैसा मिळवणे याच धोरणामुळे हुतात्माची आज बकाल अवस्था बनली आहे असा आरोप केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वात कमी दर देणारा कारखाना म्हणून हुतात्माचा लौकिक तयार झाला. कामगारांचा बोनस ४० टक्यावरून ८ टक्के झाला आहे असा आरोप केला जात आहे. गेल्या २० वर्षात राज्य आणि केंद्र सरकारची धोरणे सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. कारखान्यावर ४५० कोटी रुपयांचे कर्ज केल्याचा आरोप केला असून वैभव नायकवडी यांनी ते तातडीने फेडावे, त्याशिवाय आंदोलन थांबणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. गेल्या पाच दिवसात वैभव नायकवडी हे आंदोलनाकडे फिरकले नाहीत.


















