सातारा : कराड येथील अथणी शुगर्स (रयत युनिट) या साखर कारखान्याचा हंगाम यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये कारखान्याने एकूण ४ लाख १९ हजार ८०८ मेट्रिक टन ऊस गाळप केला. शेवटच्या टप्प्यात गाळप झालेल्या ऊसाला प्रति मेट्रिक टन ३५०० दराने अंतिम बिल अदा करण्यात आले. एकूण १४६.९३ कोटींची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास पाटील यांनी दिली.
कारखान्याने यंदा विस्तारीकरणाची कामे पूर्ण करून वाढीव क्षमतेने गाळप केले तसेच सहवीज निर्मिती प्रकल्पही कार्यान्वित करण्यात आल्याने औद्योगिक प्रगतीला नवे बळ मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर चेअरमन उदयसिंह पाटील यांनी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले. मात्र, अवेळी पावसाचा फटका बसल्याने ऊस उत्पादनात घट झाली आणि त्यामुळे गाळप उद्दिष्ट पूर्ण करता आले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या यशस्वी हंगामात अथणी शुगर्सचे चेअरमन श्रीमंत पाटील, रयत कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील, व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास पाटील, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर व सीएफओ योगेश पाटील, युनिट हेड रविंद्र देशमुख, तसेच अधिकारी, कर्मचारी, ऊस पुरवठादार शेतकरी व तोडणी-वाहतूक कंत्राटदार यांचे मोलाचे योगदान राहिले.


















