सातारा : कृष्णा कारखान्यामध्ये बॉयलर अग्निप्रदीपन उत्साहात, हंगाम यशस्वी करण्याचा निर्धार

सातारा : यंदा दुष्काळाचे सावट आणि उसाची टंचाई अशा स्थितीतही यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना आगामी गाळप हंगाम यशस्वी करेल, असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केला. कारखान्याच्या ६७ व्या गाळप हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात झाला. याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी डॉ. भोसले व त्यांच्या पत्नी उत्तरा यांच्या हस्ते बॉयलर प्रदीपन करण्यात आले. या वेळी कृष्णा विश्व विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, कऱ्हाड पंचायत समितीच्या सभापती नंदाताई यादव, जिल्हा परिषदेच्या सदस्या प्रियांका साळुंखे, शैलजा शिंदे, माजी सदस्य जितेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य प्रदीप पाटील आदी उपस्थित होते.

डॉ. भोसले म्हणाले की, साखर कारखानदारीसमोर आव्हानात्मक स्थिती आहे, तरीही शिस्त व पारदर्शक कारभाराच्या बळावर यशाची परंपरा कायम राखेल. सध्या शेतकरी संघटनांकडून सरकारकडे साखरेची किमान विक्री किंमत प्रतिकिलो ५० रुपये करण्याची मागणी केली जात आहे. वाढता वाहतूक खर्च, डिझेल आणि पीपी बॅग्जचे वाढलेले दर पाहता साखरेची किमान विक्री किंमत ४५ ते ५० रुपये मिळाल्याशिवाय ही कारखानदारी टिकणे कठीण झाले आहे. बाजीराव सुतार यांनी प्रास्ताविक केले. कऱ्हाड तालुका साखर कामगार संघाचे अध्यक्ष एम. के. कापूरकर यांनी स्वागत केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. संचालक लिंबाजी पाटील यांनी आभार मानले. संचालक शिवाजीराव पाटील, संजय पाटील, संचालक लिंबाजी पाटील, दयानंद पाटील, बाबासाहेब शिंदे, सुनील पाटील, संग्राम पाटील, छबन कांबळे, संचालिका सुनीता शेवाळे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here