सातारा : येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी सलग तिसऱ्यांदा डॉ. सुरेश भोसले यांची एकमताने निवड झाली आहे. व्हाइस चेअरमनपदी जे. डी. मोरे (रेठरे हरणाक्ष-वाळवा) यांची सर्वानुमते निवड झाली. “सभासदांनी सलग तिसऱ्यांदा आमच्यावर विश्वास टाकला आहे. पुढील पाच वर्षांत अधिकाधिक ऊसदर, आधुनिक सुविधा आणि सभासद हिताचे निर्णय राबवून कृष्णा कारखान्याला राज्यातील पथदर्शी आदर्श कारखाना बनविण्याचा आमचा संकल्प आहे.” अशी ग्वाही डॉ. सुरेश भोसले यांनी चेअरमनपदी निवडीनंतर दिली.
कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत जयवंतराव भोसले सहकार पॅनलने तब्बल १४ हजार ५०० हून अधिक विक्रमी मताधिक्याने सर्व २१ जागांवर विजय मिळवत ऐतिहासिक हॅट्रिक साधली होती. त्यानंतर बुधवारी कारखाना कार्यस्थळी चेअरमन व व्हाईस चेअरमन निवड प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव उपस्थित होत्या. चेअरमनपदासाठी डॉ. सुरेश भोसले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यांना संचालक जगदीश जगताप यांनी सूचक, तर दयानंद पाटील यांनी अनुमोदक म्हणून पाठिंबा दिला.
व्हाइस चेअरमनपदासाठी जे. डी. मोरे यांच्या अर्जाला सुनील पाटील सूचक, तर सत्यजीत पाटील अनुमोदक होते. निवड जाहीर होताच जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत नूतन पदाधिकाऱ्यांचे उत्साहात स्वागत केले. सहाय्यक निबंधक संजय जाधव, राहुल देशमुख, उर्मिला राजमाने, सर्व संचालक, पदाधिकारी, कराड व वाळवा तालुक्यातील शेतकरी सभासद उपस्थित होते.


















