सातारा : किसनवीर कारखान्याच्या कामगारांचे तब्बल १५ महिन्यांपासून पगार थकले आहेत. दुसरीकडे, पॅकेजरुपी शासनाची मदत घेऊनही सभासद शेतकऱ्यांचे ७८ कोटी थकले आहेत, असा आरोप भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष प्रवीण बावर यांनी केला आहे. कारखान्याने शेतकरी, कामगारांना वाऱ्यावर सोडले आहे. आमच्या घामाच्या पैशावर डल्ला मारुन स्वतःच्या गाड्या आणि बंगले चमकवणाऱ्या नेत्यांना आता रस्त्यावर फिरु देणार नाही, असा इशारा बाबर यांनी दिला.
बाबर म्हणाले की, सरकारकडून मिळालेली ४६७ कोटींची मदत, प्रतापगड सोडताना पदरात पडलेले ६८ कोटी आणि शेतकऱ्यांनी विश्वासाने उभे केलेले ४३ कोटी असे ५७८ कोटी गेले कुठे ? याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यावे. एकेकाळी कारखान्याचे सर्वेसर्वा राहिलेले मदन भोसले आज सोयिस्कररित्या शांत का आहेत? हेही त्यांनी सांगावे. कारखान्याबाबत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये समझोता झाला आहे का? असा प्रश्नही बाबर यांनी केला आहे.


















