सातारा : श्रीराम सहकारी साखर कारखाना आगामी तीन महिन्यांत प्रतिदिन पाच हजार मेट्रिक टन ऊस गाळप करणार आहे. कारखाना इतरांच्या बरोबरीने ऊस दर देईल याचा विश्वास मला वाटतो, असे प्रतिपादन आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले. श्रीराम कारखाना सुरू झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संचालक संजीवराजे नाईक-निंबाळकर, कारखान्याचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शेंडे, उपाध्यक्ष नितीन भोसले, संचालक सांगळे आदींसह संचालक उपस्थित होते. गेल्यावर्षी, २०२५-२६ च्या गळीत हंगामातील उसाच्या उर्वरित बिलापोटी प्रतिटन १०० रुपये आणि प्रतिटन साखर दिवाळीपूर्वी देणार असल्याचे संचालक संजीवराजे यांनी जाहीर केले.
कारखान्याचे संचालक संजीवराजे म्हणाले की, अनेकांच्या अथक प्रयत्नांतून हा कारखाना पुन्हा सुरू झाला असून, यामध्ये रामराजे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. सभासद व वाहतूकदारांनी सहकार्य करावे, तसेच ऊस उत्पादकांनी आपला संपूर्ण ऊस श्रीराम कारखान्याला घालावा. कारखान्याच्या दराबाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात काही शंका आहेत. मात्र, तालुक्यातील, तसेच परिसरातील अन्य कारखान्यांच्या दराप्रमाणेच श्रीरामचा दर राहील. त्यापेक्षा कमी दर दिला जाणार नाही. तर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. बााळासाहेब शेंडे यांनी सांगितले की, आमदार रामराजे निंबाळकर, संजीवराजे निंबाळकर, रघुनाथराजे निंबाळकर यांच्या प्रयत्नांमुळे आणि सभासदांनी दाखविलेल्या विश्वासामुळे प्रतिकूल परिस्थितीत कारखाना पुन्हा सुरू झाला आहे, असे सांगितले.


















