सातारा : आम्ही कारखाना ताब्यात घेतला, तेव्हा व्यापाऱ्यांची देणी देण्यासाठी पैसे नव्हते. मात्र मागील ११ वर्षात कारखान्याने नवी उंची गाठली आहे. आर्थिक व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केल्याबद्दल कारखान्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. येणाऱ्या ५ वर्षात सिंचन योजनांचे आधुनिकीकरण करायचे आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून निधी आणण्याचा आमचा प्रयत्न राहील असे प्रतिपादन यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. वाठार (ता. कराड) येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. डॉ. भोसले यांनी अविनाश मोहिते यांच्या कारभारावर घणाघाती टीका केली. सत्ता असताना विरोधकांनी केवळ घोटाळेच केले. त्या पलीकडे त्यांनी काय केले ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
यावेळी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक दत्तात्रय देसाई, लिंबाजी पाटील, संभाजी पाटील, दयानंद पाटील, मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनावले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आगामी काळात जमीन क्षारपडमुक्त करण्यासाठी विशेष अभियान राबविले जाणार आहे. कार्यक्षेत्रातील सर्व पाणंद रस्ते पूर्ण करायचे आहेत. तसेच ऊसदरातही एक नंबरला आम्ही राहू, अशी खात्री देतो असे चेअरमन डॉ. भोसले म्हणाले. आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी डॉ. सुरेशबाबांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने पारदर्शक कारभार केल्याचे सांगितले. ते म्हणाले की, कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला. मागील ११ वर्षात कारखान्याला १४ पुरस्कार मिळाले असून, त्यापैकी ८ पुरस्कार व्हीएसआयच्या माध्यमातून मिळाले आहेत. आटके गावातील प्रचार सभेला उमेदवार अरविंद पाटील यांच्यासह पंचायत समिती सदस्य पै. धनाजी पाटील, गजेंद्र पाटील, विजय पाटील, कोयना बँकेचे संचालक अजित पाटील उपस्थित होते. राजेश पाटील-वाठारकर, संचालक दत्तात्रय देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले.


















