सातारा: केंद्र सरकारच्या ॲक्सिलरेटेड इरिगेशन बेनिफिटस् प्रोग्रॅम (एआयबीपी) अंतर्गत सहकारी तत्त्वावरील पाणीपुरवठा योजनांचे सक्षमीकरण करून, इरिगेशन स्कीम नवीन करू. सभासदांचा एक रुपयाही घेतला जाणार नाही, अशी घोषणा यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी केली. जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचारार्थ येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी पॅनेलच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन झाले. येत्या काळात सर्वांगीण विकास करण्यासाठी नावीन्यपूर्ण प्रकल्प राबवण्याचा मानस आहे. पाणीपुरवठा योजनांचे आधुनिकीकरण, मोटारींची क्षमता वाढ, तसेच एआय व्यवस्थापन प्रणाली विकसित करून पाणीपट्टी कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. कॉम्प्रेस बायोगॅस प्रकल्पसारखे उपक्रम सुरू करून, शेतकरी सभासदांना हितासाठी अनेक निर्णय घेण्याचा संकल्प आहे असे ते म्हणाले.
विरोधकांनी त्यांच्या काळात घोटाळ्यांशिवाय काही केले नाही अशी टीका भोसले यांनी केली. यावेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते, आमदार डॉ. अतुल भोसले, उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक धोंडीराम जाधव, श्रीरंग देसाई, सयाजी यादव, वसंतराव शिंदे, जिल्हा परिषद सदस्या शैलजा शिंदे, रवी ताटे, मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनावले, पंचायत समितीच्या सभापती नंदाताई यादव उपस्थित होते. यावेळी सहकार पॅनेलच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन झाले. मदनराव मोहिते, श्रीरंग देसाई, ब्रह्मानंद पाटील आदींचीही भाषणे झाली. या सभेला सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















