सातारा : सध्या सर्वत्र आडसाली हंगामातील उसाच्या लागणी करण्याची लगबग सुरू आहे. त्यासाठी ऊसबेणे मळा अथवा स्वतःच्या शेतातील उसाच्या कांड्या वापरून ऊस लागणी होतात. काही शेतकरी खरिपातील सोयाबीनचे पीक घेऊन त्याच्या काढणीनंतर ऊसरोपांची लागण करतात. शेतकरी उसाचे एकरी शंभर टन उद्दिष्ट गाठण्यासाठी लागवडीपासून ऊसतोड होईपर्यंत सूक्ष्म नियोजन करताना पाहायला मिळत आहे. तशीच परिस्थिती शेरे परिसरात दिसत आहे. येथील प्रगतशील शेतकरी अमोल प्रल्हाद ऊर्फ बाळासाहेब निकम यांनी शेतात प्रथमच ऊसरोप निर्मितीची पद्धत हाती घेतली आहे.
या परिसरातील शेतकरी आता नर्सरीतून तयार रोपे आणण्याऐवजी स्वतः शेतातच ऊसरोपे निर्मिती करण्याकडे वळत आहेत. शेतकरी स्वतः शेतातच ऊसरोप तयार करण्याच्या पद्धतीकडे वळत आहे. शेतातील योग्य ऊसबेण्याची तोड करून तो ऊस शेतात आणून त्याचे डोळे एका बाजूला करून लागणीपूर्व कांडीची प्रक्रिया पूर्ण केली जाते. या बदलत्या पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान टळत आहे व आर्थिक बचत होत असल्याने बदलती पद्धत फायदेशीर ठरत आहे. शेतकरी अमोल निकम हे दीड एकर क्षेत्रात पीक घेतात. यासाठी दहा हजार रोपे तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सध्या सुरू आहे. नर्सरीतील रोपांची मोठ्या प्रमाणात मर राहते. त्या रोपांच्या लागणीनंतर उसाच्या समूहात डाली पडतात, तसेच ती रोपे रोगराईलाही बळी पडतात. या त्रासाबरोबर ऊसतोड झाल्यानंतर उत्पादनातही घट होत असल्याने हा रोपे निर्मितीचा पर्याय चांगला असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.


















