सातारा : गेली अनेक वर्षे कराडसह सातारा जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये आठवडी बाजार, मुख्य बाजारपेठा आणि किराणा दुकानांमध्ये “सेंद्रिय गूळ” म्हणून मोठ्या प्रमाणावर विक्री होत होती. नैसर्गिक, रसायनमुक्त आणि आरोग्यदायी असल्याचा दावा करून हा गूळ ग्राहकांना जादा दराने विकला जात होता. मात्र, अन्न भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून कठोर कारवाई सुरू झाल्यापासून अशा विक्रेत्यांची संख्या अचानक कमी झाली असून अनेक ठिकाणी सेंद्रिय गूळ मिळणेही बंद झाले आहे. एफडीएच्या कारवाईचा परिणाम आता “सेंद्रिय” या नावाखाली विकल्या जाणाऱ्या गुळाच्या विक्रीवरही दिसून येत आहे.
कृषी आणि अन्न क्षेत्रातील जाणकारांच्या मते, “सेंद्रिय” हा शब्द वापरण्यासाठी संबंधित प्रमाणपत्र आणि निश्चित निकष पूर्ण करणे आवश्यक असते. मात्र, अनेक विक्रेते कोणतेही प्रमाणपत्र नसताना ग्राहकांची दिशाभूल करत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा उत्पादनांची प्रयोगशाळेत तपासणी करून सत्य समोर आणण्याची गरज व्यक्त होत आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. बनावट पनीर, निकृष्ट दूध, भेसळयुक्त मिठाई, मसाले आणि इतर खाद्यपदार्थांवर सातत्याने छापे टाकून मोठ्या प्रमाणावर माल जप्त केला गेला. त्यानंतर त्यांनी गुळ उत्पादकांकडे मोर्चा वळवला. अनेक गुळ व्यापाऱ्यांनी कारवाईच्या भीतीने विक्री थांबवल्याची चर्चा बाजारात आहे. याबाबत शेती मित्र अशोकराव थोरात म्हणाले की, शिवाय, कराडच्या बाजारात सेंद्रिय गुळ अथवा काकवी विक्री सुरू होती. पण अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर ती विक्री अचानक थांबली. सेंद्रिय गुळ मिळेना. याचा अर्थ “सेंद्रिय” या नावाखाली हे पदार्थ विकले जात होते. अशा विक्रेत्यांवर कारवाई झाली पाहिजे.

















