सातारा: येथील जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयात अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने सदिच्छा भेट दिली. अमेरिकेतील डॉ. अनुराधा गणेशन यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या या १४ सदस्यीय विशेष शिष्टमंडळाचे महाविद्यालयातर्फे स्वागत करण्यात आले. शिष्टमंडळातील सदस्यांनी महाविद्यालयाच्या विविध विभागांना भेटी देऊन सुविधांची पाहणी केली. कृषी पदवीच्या शेवटच्या वर्षातील अनुभवजन्य शिक्षण कार्यक्रमातील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पना आणि शेतीविषयक उपक्रमांमधील परिश्रमांचे पाहुण्यांनी विशेष कौतुक केले. प्राचार्य डॉ. अशोक फरांदे यांनी विशेष सादरीकरणाद्वारे महाविद्यालयात राबवल्या जाणाऱ्या शैक्षणिक, संशोधनात्मक आणि शेतीपूरक उपक्रमांची माहिती दिली.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याशी संलग्न या महाविद्यालयाच्या भेटीप्रसंगी अमेरिकेतील उच्चस्तरीय लष्करी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. शिष्टमंडळ प्रमुख डॉ. अनुराधा गणेशन यांच्यासह कर्नल गाइस्ट चेर्जे चारला, डॅनिअल रॉबर्ट लाँगमायर, बुद्धिका राजीव अबेयरत्ने, कमांडर डेव्हिड हारलिंग क्रेग तिसरे, वॉरेन ब्लेक वू, कॅप्टन जूंग हून चोई, जेराल्ड माइल्स बॉव्हर्स ज्युनियर, एमिली अॅन जाबेरी, जेसिका लिन हॅल्पेन, मेजर टॅटियाणा व्हिलालोबॉस, जॉय मॅरी बॉटिस्टा, मेगन में केन्झी बाईस आणि कॅरोलिन मारिया मॅकेन्ना आदी सहभागी होते. यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, कृष्णा विश्व विद्यापीठाच्या उपसंचालक अर्चना कौलगीकर, उपकुलसचिव एस. ए. माशाळकर यांच्या हस्ते शिष्टमंडळातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला.


















