श्री विघ्नहर कारखान्यात एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी स्वतंत्र विभाग : अध्यक्ष सत्यशील शेरकर

पुणे : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने विस्तारीकरणानंतर यंदा १२ ते १३ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याची क्षमता निर्माण केली आहे. कारखान्याने कार्यक्षेत्रात एकरी ऊस उत्पादन वाढविण्यासाठी स्वतंत्र ऊस विकास विभाग स्थापन केला असून, त्यासाठी नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या कर्मचाऱ्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बुद्रुक, पाडेगाव ऊस संशोधन केंद्र तसेच कारखान्यात प्रशिक्षण देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक गटात कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी एकरी ऊस उत्पादन वाढविण्यासाठी मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी केले. कारखान्याची ४४ वी अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. १९) कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी ते बोलत होते.

सभेत अध्यक्ष शेरकर यांनी कारखान्याच्या विस्तारीकरण व आधुनिकीकरणाच्या कामाची सविस्तर माहिती सभासदांना दिली. ते म्हणाले की, आगामी गळीत हंगामात ११ ते १२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाल्यास विस्तारीकरणासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यास मोठी मदत होईल. सभासदांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करून कारखान्याला ऊस द्यावा. मागील गळीत हंगामात गाळपासाठी आलेल्या उसाचे एफआरपीप्रमाणे संपूर्ण देयक अदा करण्यात आल्याचे सांगितले. सभासदांची दिवाळीही गोड केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. सभेत सर्वाधिक ऊस पुरवठा करणारे शेतकरी, एकरी १०० टनांपेक्षा अधिक ऊस उत्पादन घेणारे शेतकरी, सर्वाधिक ऊस तोडणी व वाहतूक करणारे कंत्राटदार तसेच यंत्राद्वारे सर्वाधिक ऊस तोडणी करणाऱ्या कंत्राटदारांचा रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here