सोलापूर : देशात सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख आहे. बाजारपेठेत साखरेचे दर वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात साखर टंचाई जाणवेल की काय अशी परिस्थिती आहे. वाढलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर साखरेची कृत्रिम टंचाई निर्माण करून बेकायदेशीर साठेबाजी करणाऱ्या आणि चढ्या भावाने विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर वेसण घालण्यासाठी जिल्हा अन्न व नागरी पुरवठा विभागाने पथकांची नियुक्ती केली आहे. ही पथके शहर आणि ग्रामीण भागात फिरून साखर साठ्याची तपासणी करणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार पडोळे यांनी सोमवारी दिली. केंद्र तसेच राज्य सरकारने याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
जिल्हा पुरवठा अधिकारी पडोळे यांनी सांगितले की, पुरवठा निरीक्षक आणि परिमंडळ अधिकारी यांचे शहर आणि ग्रामीण भागात पथक तयार केले आहे. या पथकाला मंगळवारपासून घाऊक विक्रेत्यांकडील साखर साठा तपासणीचे आदेश दिले आहेत. ग्रामीण भागात तालुक्याच्या ठिकाणी साखरेचा मोठा साठा होऊ शकतो. त्यादृष्टीने तपासणी करायला सांगितले आहे. सर्व पथकांचा अहवाल दररोज सायंकाळी प्राप्त होणार आहे. शेतकरी संघटनांनी जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या साठ्याची तपासणी करा, अशी मागणी पंढरपुरातील बैठकीत केली होती. मात्र, जिल्ह्यातील साखर कारखान्यांना साखर साठा केंद्र सरकारच्या वेबसाईटवर अपलोड केला जातो. शेतकरी संघटनांनी प्रत्यक्ष साठा तपासणीची मागणी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेण्यात येणार आहे, असेही पडोळे यांनी स्पष्ट केले.


















