सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी थकवली ४०० कोटींची एफआरपी, कारवाईकडे दुर्लक्ष

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात गतवर्षी ऊस गळीत केलेल्या ३४ पैकी पाच ते सहा कारखान्यांनी उसाची पूर्ण रक्कम दिली आहे. उर्वरित कारखान्यांनी अद्याप उसाची रक्कम दिलेली नाही. काही कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाची रक्कम न देता ती दिली असल्याची खोटी माहिती प्रशासनाला दिल्याचाही दावा केला जात आहे. पुणे येथे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची रक्कम थकवणाऱ्या तीन कारखान्यांवरील सोमवारी आरआरसी कारवाईसंदर्भात सुनावणी झाली. मग सोलापूर जिल्ह्यातील २० पेक्षा अधिक कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाची रक्कम थकवली आहे. त्यांच्यावर तत्काळ आरआरसी कारवाई का केली जात नाही, अशी विचारणा शेतकरी संघटनांनी केली आहे. मोजक्याच कारखान्यांवर कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

गेल्या महिन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आरआरसी कारवाईसंदर्भात सोलापूरच्या विभागीय साखर कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी प्रशासनाने १० मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या थकीत रकमेबाबत कारवाई होईल, असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र राजकीय दबावामुळे प्रशासनाने काहीच केलेले नाही. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विजय रणदिवे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कोट्यवधींच्या रकमा थकीत आहेत. जिल्ह्यातील ऊस उत्पादक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. असे असताना प्रशासन मात्र कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त आहे. याबाबत शेतकरी संघटनेच्या वतीने लवकरच मोठ्या स्वरूपाचे आंदोलन उभे केले जाईल. तर साखर सहसंचालक प्रकाश अष्टेकर यांनी साखर आयुक्त सध्या पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रियेत निरीक्षक असल्यामुळे त्यांनी ऑनलाइन पद्धतीने थकीत एफआरपीबाबत सुनावणी घेतली आहे, असे सांगितले. उसाची रक्कम थकवणाऱ्या कारखान्यांबाबत टप्प्याटप्प्याने कारवाई सुरू आहे. असे त्यांनी स्पष्ट केले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here