सोलापूर : करमाळा तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जळू लागली असतानाच उसावरील किडीच्या संकटामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. उजनी धरणाच्या लाभक्षेत्रातील उसावर रसशोषक पायरीला (पाकोळी) किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे उसाच्या वजनात २० टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. किडीच्या नियंत्रणासाठी उसासाठी अतिरिक्त नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा, जैविक नियंत्रणासाठी लेडी बर्ड, बीटल्सचा वापर करावा. रासायनिक नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस ५० टक्के २५ मिली, स्टिकर व बाविस्टीन २५० ग्रॅम १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, साध्या पंपाने फवारणी शक्य नसलेल्या ठिकाणी ड्रोनच्या साह्याने फवारणी करता येते, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
सध्या या परिसरातील काही शेतकरी पिके वाचविण्यासाठी शेतकरी ड्रोनच्या साह्याने औषधांची फवारणी करीत आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच उसाचे वजन घटण्याची शक्यता असताना किडीच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मंडल कृषी अधिकारी मधुकर मारकड यांनी सांगितले की, उसावर पायरीला या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. शेतकऱ्यांनी उसासाठी अतिरिक्त नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा. दरम्यान, कृषी विभागाने औषधे उपलब्ध करून द्यावीत. साखर कारखान्यांनीही फवारणीसाठी ड्रोनची व्यवस्था केल्यास दिलासा मिळेल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.


















