अहिल्यानगर : केंद्र शासनाचे साखर विक्री धोरण कोटा पद्धतीवर आधारित आहे. केंद्र शासन दर महिन्याला प्रत्येक साखर कारखान्यास साखर विक्रीचा निश्चित कोटा मंजूर करते. त्या कोट्यानुसारच कारखान्यांना साखरेची विक्री करावी लागते. या धोरणानुसार राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी आतापर्यंत त्यांच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे ८० टक्के साखरेची विक्री आधीच केलेली आहे. सध्या प्रत्येक कारखान्याकडे केवळ २० टक्के साखरेचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे साखरेच्या सध्याच्या वाढीव बाजारभावाचा लाभ केवळ या शिल्लक साठ्यापुरताच मर्यादित राहणार आहे, असे मत अशोक कारखान्याचे चेअरमन तथा माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी व्यक्त केले. अशोक कारखान्याने गेल्या गळीत हंगामात उत्पादित केलेल्या ४ लाख क्विंटल साखर उत्पादनापैकी केवळ २० टक्के म्हणजेच ८० हजार क्विंटल साखर शिल्लक आहे. उर्वरित साखरेची विक्री शासनाच्या कोटा पद्धतीनुसार यापूर्वीच करण्यात आलेली आहे. अशीच परिस्थिती राज्यातील इतर बहुतांश साखर कारखान्यांचीही आहे, असा दावा त्यांनी केला.
चेअरमन मुरकुटे यांनी म्हटले आहे की, सध्या बाजारात साखरेच्या दरात वाढ झाल्याने साखर कारखान्यांना मोठा आर्थिक फायदा होणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र ही वस्तुस्थिती तशी नाही. साखरेच्या भाववाढीचा कारखान्यांना अत्यंत मर्यादित लाभ होणार आहे. त्यामुळे साखरेच्या वाढलेल्या दराचा अनावश्यक गवगवा करणे योग्य ठरणार नाही, आधी विक्री झालेल्या साखरेला सरासरी रुपये ३७०० प्रति क्विंटल दर मिळाला आहे. शिल्लक २० टक्के साखरेला वाढीव दर मिळाला, तरी संपूर्ण हंगामातील उत्पादित साखरेचा सरासरी विक्री दर रुपये ३८०० ते ३९०० प्रति क्विंटल इतकाच राहील. त्यामुळे साखरेच्या सध्याच्या भाववाढीमुळे कारखान्यांच्या आर्थिक स्थितीत मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल किंवा कारखान्यांना प्रचंड आर्थिक लाभ होईल, असा निष्कर्ष काढणे योग्य नाही.


















