कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील अथणी शुगर्स लि.च्या भुदरगड युनिटच्या सन २०२६-२७ या वर्षातील ११ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनिवास श्रीमंत पाटील यांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून करण्यात आला. यंदाचा हंगाम दुष्काळी परिस्थिती आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे आव्हानात्मक असला, तरी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत ऊसदराची परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. चालू हंगामात ३.५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.
गळीत हंगामाच्या मोळी पूजन कार्यक्रमात बोलताना श्रीनिवास पाटील म्हणाले की, यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने तसेच पाऊस अवेळी झाल्याने राज्यातील दुष्काळी परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. याचा फटका माळरानावरील ऊस पिकांना बसत असून अनेक ठिकाणी ऊस वाळू लागला आहे. परिणामी, उसाची वाढ, वजन आणि साखर उताऱ्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.
शेतीसाठी लागणारी खते, औषधे, मजुरी आणि इतर निविष्ठांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली असून त्याचा परिणाम साखर उद्योगाच्या आर्थिक गणितावरही होत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही कारखाना शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.साखरेच्या दरात वाढ झाल्यास त्याचा लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कारखाना प्रयत्नशील राहील. तसेच शेजारील कारखान्यांप्रमाणे ऊसदराची परंपरा कायम राखण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही पाटील यांनी नमूद केले.
कारखान्याचे कामगार मेहनती, प्रामाणिक आणि कष्टाळू असून संकटाच्या काळातही जबाबदारीने काम करण्याची त्यांची परंपरा आहे. त्यामुळे कामगारांच्या हिताबाबत कारखान्याने नेहमीच समाधानकारक भूमिका घेतली आहे. ऊसतोडणी कामगारांनीही दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.या कार्यक्रमाला कारखान्याचे चीफ इंजिनिअर नामदेव पुंडलिक भोसले, चीफ केमिस्ट प्रकाश बापूसो हेंदुरे, चीफ अकाउंटंट जमीर इरशाद मकानदार यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी आणि ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.प्रास्ताविक शेती अधिकारी राजाराम आमते यांनी केले, तर कार्यालय अधीक्षक बाबासाहेब देसाई यांनी स्वागत करून आभार मानले.


















