साखरेचा दर प्रतिकिलो ५५ रुपये, इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७५ रुपये करावा : ‘दत्त’चे मार्गदशक संचालक गणपतराव पाटील यांची मागणी

कोल्हापूर : येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याची आणि श्री दत्त शेतकरी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्टची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. कारखान्याने यंदा १५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखान्यात प्रेसमड व स्पेंट वॉशवर आधारित सीबीजी प्रकल्प उभारण्यात येणार असून, दहा टीपीडी क्षमतेचा हा प्रकल्प ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर पुण्याच्या विशालसागर इंडस्ट्रीजला देण्यात येणार आहे, अशी घोषणा कारखान्याचे मार्गदशक संचालक गणपतराव पाटील यांनी केली. सद्यस्थितीत साखरेचे उत्पादन, खप आणि दरातील असमतोलामुळे साखर कारखानदारीचे आर्थिक चक्र अडचणीत आले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने साखरेच्या आधारभूत किमतीत वाढ करणे, हा एकमेव पर्याय असल्याचे पाटील यांनी सांगितले.

यावेळी आयोजित सभेत केंद्र शासनाने साखरेचा दर प्रतिकिलो ५० ते ५५ रुपये आणि इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७५ रुपये करावा, अशी मागणी मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील यांनी केली. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष रघुनाथ पाटील म्हणाले की, ‘गळीत हंगामात ऊस उत्पादकांना एफआरपीपेक्षा प्रतिटन १२२ रुपये जादा दर दिला आहे. कारखान्याच्या ऊर्जाकुर सहवीज निर्मिती प्रकल्पातून गेल्या हंगामात आठ कोटी ८० लाख युनिट वीज उत्पादन झाले. त्यापैकी पाच कोटी ४५ लाख युनिट वीज एमएसईबी ग्रिडला पुरविण्यात आली. कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन केले. आमदार डॉ. अशोकराव माने, नगराध्यक्षा योगीता कांबळे, उपाध्यक्ष शरदचंद्र फाटक, संचालक अनिलकुमार यादव, बाबासाहेब पाटील, विश्वनाथ माने, शेखर पाटील, प्रमोद पाटील, दरगू गावडे, अमर यादव, विनया घोरपडे आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here