कोल्हापूर : उत्पादन खर्च वाढला आहे, दुष्काळामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळालाच पाहिजे. कारखानदारांनी प्रतिटन पाच हजार रुपये दर जाहीर करावा, (पहिला हप्ता एकरकमी ४५०० रुपये आणि नंतर ५०० असे एकूण ५००० रुपये प्रति टन) अन्यथा साखर कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. याचबरोबर केंद्र सरकारच्या बैठकीत निर्णय न झाल्यास महाराष्ट्र, कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोल नाक्यावर चक्का जाम करणार असल्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
जयसिंगपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शनिवारी आयोजित २५ वी ऊस परिषद येथील विक्रमसिंह क्रीडांगण येथे हजारोंच्या उपस्थितीत झाली. यावेळी शेट्टी बोलते होते. या परिषदेला महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. साखरेची एमएसपी ५० रुपये, सी हेवी इथेनॉल ७० रुपये, उसाला प्रती टन ५०० रुपये थेट अनुदान यासह विविध मागण्या केंद्र आणि राज्य सरकारकडून मान्य केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
यावेळी शेट्टी यांनी ऊसदरासह साखर उद्योगातील गैरव्यवहार, दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांची कर्जमाफी, कृषिपंपांची वीजबिल माफी आदी प्रश्नावरून केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ऊस तोडणीला होणारा विलंब आणि वाहतुकीमुळे साखर उताऱ्यात घट होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्याची भरपाई म्हणून केंद्र व राज्य सरकारने ऊस उत्पादकांना प्रतिटन ५०० रुपये अनुदान द्यावे. तसेच १५ डिसेंबरनंतर तोडणी होणाऱ्या उसाला ठरलेल्या दरापेक्षा प्रतिटन ३०० रुपये जादा दर मिळाला पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
शेट्टी म्हणाले, ‘‘ऊस उत्पादक शेतकरी दिवसेंदिवस आर्थिक संकटात सापडत आहे. शेतीचा उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे. खते, औषधे, मजुरी, ऊसतोडणी आणि वाहतुकीचा खर्च वाढत असताना शेतकऱ्यांच्या उसाला मात्र अपेक्षित दर मिळत नाही. साखर कारखानदार आपली आर्थिक गणिते मांडतात; मात्र शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाचा विचार केला जात नाही, असेही ते म्हणाले. साखर उद्योग आर्थिक संकटातून जात असल्याचे सांगून शेट्टी म्हणाले, ‘केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्रीदर प्रतिकिलो ३१ रुपयांवरून ५० रुपये करावा. त्याचबरोबर सी-हेव्ही मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७० रुपये करावा. इथेनॉल उत्पादन घटल्यामुळे प्रकल्पांसाठी घेतलेल्या कर्जाचे व्याज आणि हप्त्यांचा भार साखर कारखान्यांवर आणि पर्यायाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर पडणार आहे. त्यामुळे इथेनॉल प्रकल्पांच्या कर्जासाठी संपूर्ण वर्षभराची व्याजसवलत आणि हप्ते भरण्यास मुदतवाढ देण्याची योजना केंद्र सरकारने जाहीर करावी.’’ देशातील साखर उद्योगावर पाच कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि १५ लाख कामगार व शेतमजुरांची उपजीविका अवलंबून असल्याचे सांगत त्यांनी या उद्योगाला आर्थिक स्थैर्य देण्यासाठी विशेष धोरण राबविण्याची मागणी केली.
यावेळी अजित पोवार,अनिल पवार, मयुर बोर्डे, सुर्यभान जाधव,प्रकाश पोपळे, प्रकाश बालवडकर, घनश्याम चौधरी, राजेंद्र गड्ड्यान्नावर, चुन्नाप्पा पुजारी, अॅड. योगेश पांडे, व्ही. एम. सिंह, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. ऊस परिषदेसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाहनांसाठी सिद्धेश्वर मंदिर परिसर व हॉटेल शांभवीसमोरील मैदान, शिरोळकडून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वाहनांसाठी दसरा चौक तर कोल्हापूरहून येणाऱ्या वाहनांसाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती.


















