उत्तर प्रदेश: फेब्रुवारीतच तापमानाचा चार दशकांचा उच्चांक, शेतकऱ्यांना बसणार फटका

हमीरपूर : उत्तर प्रदेशमधील हमीरपूर जिल्ह्यात यावर्षी फाल्गुन महिन्यातच तापमानाने गेल्या चार दशकांतील उच्चांक मोडला आहे. सातत्याने तापमान वाढत असल्याने गव्हाच्या पिकावरही संकट ओढवले आहे. थंडीच्या काळात पारा वाढल्याने कृषी संशोधकही चिंतेत आहेत. आतापासूनच उन्हाच्या झळा भाजून काढत असल्याने शेतकरी पिकांबद्दल चिंता व्यक्त करीत आहेत. गेल्या १२ दिवसांत तापमान सातत्याने वाढत आहे.

नवभारत टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, हमीरपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात १,२९,८६४ हेक्टरवर गव्हाची पेरणी केली आहे. तर ३,७९५ हेर्टरमध्ये जवस, ७०,१५४ हेक्टरमध्ये हरभरा, १६,१६६ हेक्टरमध्ये मटरचे पिक घेतले आहे. शेतकऱ्यांना शेतात डोलणाऱ्या पिकांपासून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र, हवामान बदलामुळे आणि वेळेपूर्वीच उष्णतेच्या लाटेमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गव्हासह इतर पिकांवर संकट गंभीर बनले आहे. कृषी संशोधक डॉ. एस. पी. सोनकर यांनी सांगितले की, ही स्थिती पिकांसाठी चांगली नाही. थंडीच्या हंगामातच ३० डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचलेल्या तापमानामुळे पिकांवर विपरीत परिणाम होईल. कृषी उपसंचालक हरीशंकर भार्गव म्हणाले की, गेल्या ११ दिवसांपासून तापमान वाढत आहे. त्यामुळे गव्हाच्या पिकाला मोठा फटका बसेल. गव्हासाठी १२ ते २४ डिग्री यादरम्यान तापमानाची गरज असते. मात्र, यंदा फेब्रुवारीतच २६ ते ३० डिग्री सेल्सिअस तापमानामुळे पिकाचे मोठे नुकसान होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here