गौरी शुगरच्या पुढाकारातून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पुणे : ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गौरी शुगर साखर कारखाना अॅण्ड डिस्टिलरीज प्रा.लि., हिरडगाव (युनिट क्र. ४) यांच्या वतीने विविध सामाजिक व लोकहितकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धन, आरोग्यसेवा आणि शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात कारखाना परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणाने झाली. त्यानंतर, ओम ब्लड सेंटरच्या सहकार्याने आयोजित भव्य रक्तदान शिबिरात कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. यावेळी ओंकार ग्रुपच्या संचालिका डॉ. गौरी बाबुराव बोत्रे-पाटील यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चांडगाव, घोडेगाव आणि हिरडगाव येथील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

यावेळी डॉ. गौरी बोत्रे-पाटील म्हणाल्या, समाजाप्रति असलेली बांधिलकी जपत शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रात सातत्याने कार्य करणे हीच आमची भूमिका आहे. वाढदिवस हा केवळ उत्सव नसून समाजासाठी विधायक कार्य करण्याची संधी आहे. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि रक्तदान शिबिराला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला भविष्यातही अधिक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यास प्रेरणा देणारा आहे. या कार्यक्रमास कारखान्याचे जनरल मॅनेजर रोहीदास यादव, हिरडगावच्या सरपंच विद्या बनकर, उपसरपंच अमोल दरेकर, सदस्य गंगाराम दरेकर, चिमाजी दरेकर, रवींद्र म्हस्के, रामदास घोडके, नंदा माळी, शालेय समितीचे अध्यक्ष दीपक मचे उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here