मुंबई : पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय)चे उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळ 26 एप्रिलपासून ऑस्ट्रेलियाच्या अभ्यास दौऱ्यावर गेले आहे. 8 मेपर्यंत चालणाऱ्या या 13 दिवसांच्या दौऱ्यात ऑस्ट्रेलियातील अग्रगण्य ऊस संशोधन संस्था ‘शुगर रिसर्च ऑस्ट्रेलिया’ला भेट देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास केला जाणार आहे. महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगासाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. या शिष्टमंडळात ‘व्हीएसआय’च्या नियामक मंडळाचे सदस्य, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री राजेश टोपे यांच्यासह डॉ. अशोक कडलक, डॉ. कपिल सुशील आणि डॉ. अशोक जगताप यांसारखे वरिष्ठ शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत.
या दौऱ्यात ऊस उत्पादकता वाढवणे, साखर उतारा सुधारणा, हवामान बदलास प्रतिकार करणाऱ्या ऊस जातींचा विकास, कीड-रोग व्यवस्थापन, तसेच आधुनिक मिलिंग व प्रोसेसिंग तंत्रज्ञानाचा अभ्यास केला जाणार आहे. स्पीड ब्रीडिंगसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावरही चर्चा होणार असून महाराष्ट्रात ते लागू करण्याची शक्यता तपासली जाणार असल्याचे दैनिक ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये संशोधन संस्था, प्रयोगशाळा आणि शेतस्तरीय प्रयोग यांचा प्रभावी समन्वय साधून संशोधन थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जाते. ही पद्धत महाराष्ट्रासाठी आदर्श ठरू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. या भेटीदरम्यान व्हीएसआय आणि शुगर रिसर्च ऑस्ट्रेलिया यांच्यात सामंजस्य करार होण्याचीही शक्यता असून संयुक्त संशोधन, तंत्रज्ञान देवाणघेवाण आणि शास्त्रज्ञ प्रशिक्षणासाठी मार्ग मोकळा होऊ शकतो. या आंतरराष्ट्रीय सहकार्यामुळे अधिक उत्पादनक्षम, रोगप्रतिकारक आणि हवामान बदलास तोंड देणाऱ्या ऊस जाती विकसित करण्यास मदत होईल. त्याचबरोबर साखर उद्योगाची कार्यक्षमता वाढवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासही या दौऱ्याचा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


















