साखरेच्या एमएसपी वाढीबाबत दहा दिवसांत निर्णय घेणार : केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची ग्वाही

कोल्हापूर : देशातील साखर उद्योगासमोरील विविध अडचणींबाबत येत्या दहा दिवसांत निर्णय घेण्याची ग्वाही केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी बुधवारी दिली. नवी दिल्लीत आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकाद्वारे दिली. बैठकीला केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, मंत्री छगन भुजबळ, मंत्री गिरीष महाजन, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह राज्यातील लोकप्रतिनिधी, साखर उद्योगाशी संबंधित प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत साखर उद्योगासमोरील वाढत्या आर्थिक ताणाचा मुद्दा प्रामुख्याने मांडण्यात आला. सन २०१७ पासून ऊस उत्पादकांना दिल्या जाणार्या एफआरपीमध्ये सात वेळा वाढ झाली असली, तरी साखरेचा एमएसपी अजूनही ३ हजार १०० रुपयांवर स्थिर आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना प्रत्येक टन ऊस क्रशिंगमागे, सुमारे ७०० ते ८०० रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर साखरेचा एमएसपी ३ हजार १०० रुपयांवरून वाढवून ४ हजार ३०० रुपये करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.

ChiniMandi WhatsApp Channel

उसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा दर ६७ रुपयांवरून ७२ रुपये, मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा दर ६२ रुपयांवरून ६८ रुपये आणि धान्याधारित इथेनॉलचा दर ५७रुपये करण्यात यावा, देशातील इथेनॉल खरेदीत, ऊसाधारित इथेनॉलचा कोटा वाढवून किमान ५० टक्के करण्यात यावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. गेल्या वर्षी सरकारने सुमारे ७० टक्के ग्रेन-बेस्ड इथेनॉल खरेदी केल्याने साखर उद्योगावर विपरित परिणाम झाल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

साखर कारखान्यांना चालू हंगामातील एफआरपी अदा करता यावी आणि आगामी गाळप हंगामासाठी तयारी करता यावी, यासाठी शासनाने पुन्हा एकदा सॉफ्ट लोन योजना जाहीर करावी, तसेच सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांची विविध बँका, नाबार्ड आणि एनसीडीसीकडील कर्जाची १२ वर्षांसाठी पुनर्रचना करण्यात यावी, त्यामध्ये दोन वर्षांचा विश्राम कालावधी आणि दहा वर्षाचा परतफेड कालावधी असावा, अशीही मागणी करण्यात आली.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here