कोल्हापूर : शाहूनगर-परिते येथील श्री भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या ६९ व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. यंदा सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला ऊस भोगावती कारखान्याला पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन गोकुळ दूध संघाचे संचालक राहुल पाटील यांनी केले. कारखान्याच्या गळीत हंगामाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. गव्हाणीचे पूजन संचालक भीमराव पाटील आणि अनिता पाटील या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आले.
शेतकऱ्यांना योग्य दर देण्यासाठी कारखाना कटिबद्ध
राहुल पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांप्रमाणे ऊसदर देण्यासाठी भोगावती कारखाना कटिबद्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कारखान्याला सहकार्य करून गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी हातभार लावावा. कारखान्याचे चेअरमन प्रा. शिवाजीराव पाटील यांनी साखर उद्योगासमोरील अडचणींकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, महाराष्ट्रातील साखर कारखानदारी सध्या अडचणींचा सामना करत आहे. साखर उद्योग टिकवायचा असेल, तर साखरेला योग्य हमीभाव मिळणे आवश्यक आहे. साखरेला योग्य दर मिळाल्यास शेतकरी संघटनांच्या मागणीनुसार उसाला दर देणे शक्य होईल.
मान्यवरांचा सत्कार
कार्यक्रमाचे स्वागत उपाध्यक्ष राजेंद्र कवडे यांनी केले, तर प्रास्ताविक ज्येष्ठ संचालक बी. ए. पाटील यांनी केले. गोकुळ दूध संघाच्या नूतन संचालकपदी निवड झाल्याबद्दल राहुल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद सदस्य क्रांतिसिंह पवार-पाटील, सागर धुंदरे आणि करवीर पंचायत समितीचे सभापती साताप्पा पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील यांनी केले. कार्यकारी संचालक सागर पाटील यांनी आभार मानले.यावेळी जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, अरुण डोंगळे, ज. द.चे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील, भोगावती शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन दिगंबर मेडसिंगे, उपाध्यक्ष मोहन पाटील, सरपंच मनोज पाटील, जनरल मॅनेजर संजय पाटील, शेती अधिकारी एस. बी. चरापले यांच्यासह कारखान्याचे सभासद आणि ऊस तोडणी-ओढणी कंत्राटदार उपस्थित होते.


















