सांगली : बांबवडेत उसाच्या फडात होरपळून वृद्धाचा मृत्यू

सांगली: ऊस तुटून गेल्यानंतर मशागत करताना शेतजमिनीच्या आजूबाजूचे गवत पेटवणे एका शेतकऱ्याच्या जीवावर बेतले. उसाच्या फडात होरपळून वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला. विलास सावळा पवार (वय ८०) असे त्यांचे नाव आहे. आग लागल्याची माहिती मिळाल्यावर क्रांती साखर कारखान्याचे अग्निशामक दल व पलूस नगरपरिषद अग्निशमन विभागाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेतात अर्धवट जळालेला मृतदेह दिसून आला. तो विलास पवार यांचा असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत प्रताप पाटील व दीपक कदम यांनी पलूस पोलिस स्थानकात माहिती दिली. तासगाव-कराड मुख्य रस्त्याच्या दक्षिणेस पवार यांची शेतजमीन आहे. १५ दिवसांपूर्वी ऊस तुटल्यानंतर पाचट पेटवून पुढील मशागत सुरू होती. काल विलास पवार शेतात काम करण्यासाठी गेले होते. आजूबाजूला गवत असल्याने पवार यांनी ते पेटविले. दुपारी आजूबाजूच्या शिवारातील गवताने व खोडवा उसातील पाचटाने पेट घेतला. ही बाब शेजारी राजेंद्र पवार यांच्या लक्षात आली. त्यांनी अग्निशामक दलाला कळवले. आग आटोक्यात आणताना विलास यांचा मृतदेह सापडला. पलूस पोलिसांनी प्राथमिक पंचनामा केला. पलूस ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here