पुणे : आगामी गळीत हंगाम सन २०२६-२७ मध्ये उसाची उपलब्धता वाढविण्यासाठी छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने आतापासून प्रयत्न सुरू केले आहेत. १० मार्च ते ३० एप्रिल या कालावधीमध्ये को-८६०३२ व एमएस १०००१ या दोन ऊस जातीच्या पाच फूट सरी पद्धतीने ऊस रोपांची लागवडीसाठी कारखान्याने परवानगी दिली आहे. मार्च व एप्रिल या महिन्यामध्ये ऊस लागवडीसाठी इच्छुक सभासदांना ऊस रोपांची ५० टक्के रक्कम कारखान्याकडे जमा करावयाची असून उर्वरित ५० टक्के रक्कम कारखाना भरणार आहे. या दोन ऊस जातीच्या रोपांची लागवड करणाऱ्या सभासदांना शंभर रुपये प्रतिटन अनुदान देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, यंदाच्या हंगामात कारखान्याने योग्य नियोजनामुळे ११.३६ टक्के इतका गेल्या दहा वर्षाचील उच्चांकी साखर उतारा मिळवल्याचेही त्यांनी सांगितले. अध्यक्ष जाचक म्हणाले की, कारखाना सन २०२६-२७ च्या गळीत हंगामामध्ये ऊस रोप लागवडीमधून जास्त उत्पादन घेणाऱ्या पहिल्या तीन सभासदांना छत्रपती कारखाना बक्षीस देणार असून कारखान्याच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. जे शेतकरी मार्च-एप्रिलमध्ये ऊस लागवड करतील, त्यांचा ऊस पुढील वर्षीच्या गळीत हंगामामध्ये तुटून गेल्यानंतर ऊस बिलातून रोपांची रक्कम कपात करण्यात येणार आहे. तसेच या कालावधीमध्ये लागवड केलेल्या उसाला प्रतिटन १०० रुपये अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सभासदांनी छत्रपती कारखान्याला ऊस गाळपासाठी देणे बंधनकारक असेल. ऊस रोपे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी कारखान्याच्या ऊस विकास विभागाकडे संपर्क साधावा.

















