छत्रपती संभाजीनगर: गंगापूर तालुक्यात तापमानाचा पारा ४२ ते ४५ अंशांवर पोचल्याने जामगाव परिसरात ऊस पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला आहे. उष्ण व कोरड्या हवामानामुळे या किडीने पिकाचे मोठे नुकसान सुरू केले असून, हाताशी आलेले पीक वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाले आहेत.जामगाव, अमळनेर, कायगाव, गणेशवाडी, बोलेगाव, लखमापूर, भेंडाळा, अगरवाडगाव, गलनिंब, भिवधानोरा, घनगरपट्टी आणि शेंदूवादा परिसरात डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान लागवड केलेला ऊस सध्या ५ ते ६ महिन्यांचा आहे.
वाढत्या उष्णतेमुळे पिकाला पाण्याचा ताण असतानाच खोडकिडीने गाभा पोखरण्यास सुरवात केली आहे. अनेक शेतांत १५ ते २० टक्के पोंगे वाळल्याचे दिसून येत आहे. उष्मघाताने खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढला असून फवारणी करूनही कीड आटोक्यात येत नाही. अशीच परिस्थिती राहिल्यास उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. अळी दिसून आल्यास अझॉक्सिस्ट्रोबिन + टेबुकोनाझोल (२० मिली) आणि क्लोरपायरीफॉस + सायपरमेथ्रिन (१५ मिली) हे रसायन १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे डी. एच. राठोड (कृषी मंडळ अधिकारी, भेंडाळा) यांनी सांगितले.


















