अहिल्यानगर : उसाची उत्पादकता एकरी १०० टनांपर्यंत नेण्याचे बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

अहिल्यानगर : जोवें (ता. संगमनेर) येथील शिव ओंकार लॉन्स येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्यावतीने ऊस विकास मेळावा झाला. यावेळी माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडलग, पांडुरंग घुले, मृदाशास्त्रज्ञ डॉ. अभिनंदन पाटील, शरद थोरात, इंद्रजित थोरात, बाबासाहेब ओहोळ, गणपत सांगळे, विजय राहाणे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते. सध्याच्या स्थितीत उसाचे क्षेत्र वाढविण्यासोबतच उत्पादकता वाढवून एकरी १०० टन उत्पादन घेण्याचे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केले.

थोरात म्हणाले की, दूध व ऊस ही शाश्वत उत्पादन देणारी पिके असून, ती जपली पाहिजेत. केंद्र सरकारने साखर निर्यात बंद केल्यामुळे साखर उद्योग अडचणीत आला आहे. साखर कारखानदारी संकटात आली, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम होईल. खासगी साखर कारखान्यांची स्पर्धा वाढली आहे. मात्र, आपल्या कारखान्याने अल्कोहोल निर्मिती, वीज निर्मिती, काटकसर आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे चांगली प्रगती साधली आहे. उसाचे क्षेत्र वाढवण्याबरोबरच उत्पादकतेतही वाढ होणे आवश्यक आहे. विजेसाठी सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे. यावेळी डॉ. अशोक कडलग यांनी मार्गदर्शन केले. कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी प्रास्ताविक केले. नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष पांडुरंग घुले यांनी आभार मानले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here