सांगली : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईच्या धसक्यामुळे मुंबई, पुणे आणि नाशिकच्या व्यापाऱ्यांनी सांगलीतून गूळ मागवणे बंद केले आहे. परिणामी, गेल्या चार दिवसांपासून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतील गुळाचे सौदे पूर्णपणे ठप्प झाले आहेत. या बाजार समितीत बहुतांश गूळ हा कर्नाटकातून येतो. मात्र, महाराष्ट्रातील कडक कारवाई पाहता कर्नाटकातील व्यापाऱ्यांनी आता हा गूळ महाराष्ट्राऐवजी थेट गुजरात आणि इतर राज्यांत पाठवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सांगलीतील व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
येथील बाजार समितीत रोज सरासरी १० हजारावर गूळ रव्यांची आवक होते. या व्यापारात सुमारे १०० खरेदीदार आणि अडते सक्रिय आहेत. मात्र, मागणीच नसल्याने स्थानिक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना, सध्या बाजारात गूळ न आणण्याचे आवाहन केले आहे. सौदे बंद झाल्यामुळे या बाजारावर अवलंबून असलेल्या ४०० हमाल आणि तोलाईदारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच बाजार समितीला मिळणारा रोजचा सुमारे ५० हजार रुपयांचा करही बुडत आहे. अन्न व औषध प्रशासनाने गुळामध्ये साखर आणि रंगाचे मिश्रण असल्याने काही ठिकाणी कारवाई केली आहे. या धडक मोहिमेचा थेट फटका सांगलीतील प्रसिद्ध गूळ बाजाराला बसला आहे. दरम्यान, बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी सांगितले की, गेल्या चार-पाच दिवसांपासून गुळाला मागणी नसल्याने येथील गुळाचे सौदे ठप्प झालेले आहेत. गुळाच्या गुणवत्तेसंदर्भात जनजागृती करण्याचे काम सांगली बाजार समितीकडून करण्यात येत आहे.

















