कोल्हापूर : उस हंगाम संपल्याने सध्या कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाची आवक कमी झाली आहे. त्यामुळे काम कमी झाल्याने व अपेक्षित हजेरी मिळत नसल्याने हमालांनी दिवसाआड गूळ सौदे काढण्याची भूमिका घेतली होती. त्यांच्या भूमिकेला शेतकरी, व्यापारी यांनी संमती दर्शविली आहे. त्यामुळे आजपासून रविवारपर्यंत नियमित सौदे निघतील. सोमवारपासून (दि. २०) एक दिवसआड गूळ सौदे निघणार आहेत. दरम्यान, रसायनयुक्त गुळाच्या मुद्यावरून गेल्या दोन दिवसांच्या बंदनंतर आजपासून (दि. १५) पुन्हा गूळ सौदे निघणार आहेत.
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत बंद काळात गूळ विभागातील सुमारे १.२० कोटींची आर्थिक उलाढाल ठप्प राहिली. गुजरातच्या व्यापाऱ्यांकडून गूळ खरेदी बंदच असल्याचे सांगण्यात आले. गुजरात अन्न व औषध विभागाला भेसळयुक्त गूळ मिळल्याने तेथील व्यापारी असोसिएशनने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातून गूळ खरेदी सोमवारपासून बंद केली आहे. तर गुजरातमध्ये मिळालेला गूळ हा कोल्हापूरचा नसल्याचे येथील शेतकऱ्यांचे मत आहे. त्यामुळे त्यांनी सोमवार व मंगळवार समितीमधील आवक बंद ठेवली व या घटनेचा निषेध केला. यानंतर बुधवारपासून समितीमध्ये पुन्हा गूळ आवक सुरू होणार आहे. सद्यस्थितीत गुजरात व्यापारपेठेचे दार अजूनही कोल्हापूरच्या गुळासाठी बंदच असणार आहे.


















