कोल्हापूर : गूळ सौदे सुरू; कारवाईच्या भीतीपोटी रंगमिश्रित गुळाला व्यापाऱ्यांचा नकार

कोल्हापूर : गुजरातमध्ये दहा दिवसांपूर्वी अन्न औषध प्रशासनाने गुळाचे नमुने घेतले. यात कोल्हापूरच्या काही गुळांत रासायनिक रंग आढळले. त्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या. त्यानुसार कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी रासायनिक रंग मिश्रित गूळ खरेदी थांबवली होती. त्यामुळे सौदे बंद होते. बधवारपासून बाजार समितीने सौदे पुन्हा सुरू केले. त्यानुसार शेतकऱ्यांनी गूळ बाजारात आणला, सौद्याला लावला. व्यापाऱ्यांनी गूळ पाहिला; मात्र तो पूर्वीप्रमाणेच रंग, साखरमिश्रित असल्याने समजताच पूर्ण क्षमतेने खरेदी केली नाही. पुन्हा रसायनयुक्त गूळ पाठवल्यास पुन्हा कारवाईला सामोरे जावे लागेल, या भीतीपोटी गूळ खरेदीला ‘ब्रेक’ लागला आहे.

बुधवारी बाजार समितीत शेतकऱ्यांनी १६ गाड्या गुळाची आवक केली. काही गूळ साखर व रंगमिश्रित असल्याने खरेदीला प्रतिसाद मिळाला नाही. सध्या जिल्ह्यातील २५ गुऱ्हाळ घरांवर गूळ उत्पादन होत आहे. गूळ हंगाम आटोपत आला आहे. आवक घटली असल्यामुळे बाजार समितीत एक दिवस आड सौदे होत आहेत. सध्या बाजार समितीत जेमतेम १५ हजार गूळ रव्यांची आवक आहे. आता व्यापारी, शेतकरी व बाजार समिती सभापती यांच्यातील बैठकीत गुणवत्तापूर्ण गूळ बाजारपेठेत पूर्ण क्षमतेने आल्यानंतरच तो खरेदी करण्याचे आश्वासन व्यापाऱ्यांनी दिले. चांगल्या दर्जाचा गूळ दोन-तीन दिवसांत निर्मिती करून तोच गूळ बाजारात आणू, असे आश्वासन शेतकऱ्यांनी दिले. बाजार समितीने अधिकृतरीत्या सौदे बंदचे आदेश दिलेले नाहीत, शेतकरी व व्यापारी कारवाई होऊ नये, यासाठी सावधगिरी बाळगावी लागत असल्याचे बैठकीत दोन्ही बाजूने सांगण्यात आले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here