पुणे : बिजवडी (ता. इंदापूर) येथील ‘कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना लि.’ (सहयोगी : ओंकार शुगर अँड डिस्टिलरी पॉवर प्रा. लि.) मधील कामगार आणि कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी व थकीत पैसे मिळवण्यासाठी कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एकदिवसीय लाक्षणिक ठिय्या आंदोलन केले. कामगारांच्या वतीने कारखान्याचे कार्यकारी संचालक, इंदापूरचे तहसीलदार आणि इंदापूर पोलिस ठाणे यांना निवेदन देण्यात आले आहे. अनेक वर्षापासूनची थकीत देय रक्कम जोपर्यंत पूर्णपणे अदा केली जात नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. मंगळवारच्या एकदिवसीय ठिय्या आंदोलनानंतरही जर प्रशासनाने थकबाकी दिली नाही, तर सर्व कामगार यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला.
कर्मयोगी कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न गेल्या अनेक प्रलंबित वर्षांपासून आहेत. मंगळवारी सकाळी ९ वाजल्यापासून एक दिवसाचे उपोषण करण्यात आले. दीर्घकाळापासून हक्काचे पैसे न मिळाल्यामुळे कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्यावर प्रापंचिक अडचणींसह उपासमारीची वेळ आली आहे. कामगारांनी यापूर्वी अनेक वेळा प्रशासनाची प्रत्यक्ष भेट घेऊन तसेच लेखी पत्रांद्वारे मागण्या मांडल्या होत्या. परंतु, कारखाना प्रशासनाकडून या मागण्यांची दखल घेतली गेली नाही किंवा थकीत रक्कम अदा करण्यात आली नाही. अखेर कारखाना प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.


















