कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून झालेली साखरेची दरवाढ ही कृत्रिम होती आणि आता हे दर कमी झाले आहेत अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. साखर अत्यावश्यक वस्तू कायद्याच्या कक्षेत येत असून, केंद्राने साखरेच्या साठ्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे होते. साखर विक्रीवरील नियंत्रणाच्या अभावामुळे साठेबाजी झाली असावी. साखरेच्या कृत्रिम दरवाढीसाठी जबाबदार असणाऱ्यांची चौकशी करून महागाई वाढविणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, इथेनॉल निर्मितीसाठी साखर वळवल्यामुळे दर वाढले, असे म्हणणे योग्य नाही. अनेक कारखाने गरजेप्रमाणे साखर विकत होते. शेतकरी कर्जमुक्ती योजनेत २९ हजार ४२७ लाभार्थी असून, २३५ कोटी १६ लाख रुपये बँकांकडे आले आहेत. नियमित कर्जफेड करणाऱ्या २ लाख २६ हजार ११२ शेतकऱ्यांसाठी ९४३ कोटी ३५ लाख रुपये अपेक्षित आहेत. आतापर्यंत ५ हजार ९५ शेतकऱ्यांचे २९ कोटी ४८ लाख रुपये प्राप्त झाल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. गोकुळ’ची निवडणूक काँग्रेस नेते सतेज पाटील हे स्वतंत्रपणे लढतील. मात्र महायुतीचा विजय निश्चित आहे. निवडणुकीत कोणीही कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो. यापूर्वी शक्तिपीठ महामार्गाबाबतची भूमिका मी स्पष्ट केली आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि आमदार चंद्रदीप नरके यांनी या महामार्गाचे रेखांकन बदलण्यासाठी प्रयत्न केला. पालकमंत्र्यांशी चर्चा करून आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. हा प्रकल्प थांबवण्यासाठी प्रयत्न करू.


















