कर्नाटक : दक्षिण भारत ऊस व साखर तंत्रज्ञ संस्थेकडून चिदानंद कोरे साखर कारखान्याच्या डिस्टिलरीला ‘गोल्ड अवॉर्ड’

बेळगाव : चेन्नईतील दक्षिण भारत ऊस व साखर तंत्रज्ञ संस्थे (एसआयएसएसकेएच) कडून चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टिलरी विभागाच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत ‘गोल्ड अवॉर्ड’ने गौरविण्यात आले. साखर उद्योगाला तांत्रिक मार्गदर्शन व प्रोत्साहन देणारी ही संस्था देशातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांच्या वार्षिक कामगिरीचे मूल्यांकन करते. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कारखान्यांना दरवर्षी विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येते. चेन्नईत झालेल्या समारंभात संचालक, व्यवस्थापकीय संचालक तसेच डिस्टिलरी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी कारखान्याचे संस्थापक व पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांनाही साखर उद्योगातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

पुरस्कारानंतर डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले की, कारखान्याची सुरुवातीची गाळप क्षमता केवळ २ हजार टीसीडी होती. परिसरातील वाढती ऊस लागवड आणि शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन कारखान्याच्या गाळप क्षमतेचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्यात आला. आता कारखाना रोज १० हजार मेट्रिक टन ऊस गाळप करण्याच्या क्षमतेपर्यंत पोहोचला आहे. तसेच २०० केएलपीडी क्षमतेचा आधुनिक इथेनॉल प्रकल्प आणि ३१.७ मेगावॅट क्षमतेचा सहवीज प्रकल्प कार्यरत आहे. तर कारखान्याचे संचालक अमित कोरे म्हणाले, गेल्या गळीत हंगामात कारखान्याने इतिहासातील सर्वाधिक उसाचे गाळप केले. त्याचबरोबर सहवीज निर्मिती व डिस्टिलरी हे उपउत्पादन विभागही पूर्ण क्षमतेने कार्यरत राहिले. त्यामुळे कारखान्याला हा पुरस्कार मिळविण्यात यश आले. अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे यांनी डॉ. प्रभाकर कोरे यांचे मार्गदर्शन, अमित प्रभाकर कोरे यांचे नेतृत्व, संचालक मंडळ, सभासद, शेतकरी कर्मचाऱ्यांमुळे हा गौरव प्राप्त झाल्याचे सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here