महाराष्ट्र : ऊसतोड कामगारांच्या हक्कांसाठी राज्यात ‘सुरक्षित ऊस अभियान’; सरकार आणि साखर उद्योगाचा संयुक्त पुढाकार

पुणे : राज्यातील ऊसतोड कामगारांचे हक्क, सुरक्षितता आणि कल्याणकारी योजनांविषयी जनजागृती करण्यासह त्यांच्यापर्यंत आवश्यक मदत व सेवा पोहोचविण्यासाठी राज्य सरकार, साखर उद्योग आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत ‘बोनसुक्रो’ (Bonsucro) संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राज्यात ‘सुरक्षित ऊस अभियान’ सुरू करण्यात आले आहे.

साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्या पुढाकाराने काही महिन्यांपूर्वी साखर आयुक्तालयात आयोजित आंतरविभागीय गोलमेज परिषदेत स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या समस्या, त्यांचे हक्क आणि त्यांच्या कुटुंबीयांसमोरील अडचणींवर सविस्तर चर्चा झाली होती. या चर्चेतूनच या अभियानाची संकल्पना पुढे आली.या उपक्रमात साखर आयुक्तालय, बोनसुक्रो, वेस्टर्न इंडिया शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) आणि महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ सहभागी झाले आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel

अभियानाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना साखर आयुक्त डॉ. संजय कोलते म्हणाले, “राज्यातील ऊसतोड कामगारांना सन्मानाची वागणूक मिळणे आवश्यक आहे. त्यांना आवश्यक मदत, सुविधा आणि सेवा उपलब्ध करून देण्यासाठी योग्य नियोजन करणे, हा सुरक्षित ऊस अभियानाचा मुख्य उद्देश आहे.”

ते पुढे म्हणाले, “ऊसतोड कामगारांचे संरक्षण हा जबाबदार आणि शाश्वत साखर उद्योगाचा महत्त्वाचा भाग आहे. या अभियानाच्या माध्यमातून शासकीय यंत्रणा, साखर कारखाने आणि संबंधित घटकांना कामगारांच्या हितासाठी ठोस कृती करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे. कामगारांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे आणि त्यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळवून देणे, हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.” यंदाच्या गाळप हंगामातील पहिल्या दोन महिन्यांत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे नियोजन असून, त्यासाठी विभागीय स्तरावर विशेष प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.

यावेळी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचे प्रशांत चव्हाण म्हणाले, “कामगारांसाठी कल्याणकारी उपक्रम आणि सामाजिक सुरक्षा योजना केवळ कागदावर किंवा योजनेपुरत्या मर्यादित राहून चालणार नाहीत. या योजनांची योग्य माहिती कामगारांपर्यंत पोहोचण्याबरोबरच त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे.”

कामगार उपायुक्त अभय गिते यांनी ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत उपक्रम तसेच कल्याणकारी योजनांपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने आणि एकात्मिक पद्धतीने काम करण्याची गरज व्यक्त केली. बोनसुक्रोच्या आशिया-पॅसिफिक विभागाच्या प्रमुख मनीषा मजुमदार यांनी या अभियानामुळे ऊसतोड कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध सेवा आणि मदत उपक्रमांना अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, ‘विस्मा’चे कार्यकारी संचालक अजित चौगुले यांच्यासह साखर उद्योगाशी संबंधित विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here