सातारा : खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजेंद्र तांबे, तर उपाध्यक्षपदी धनाजी अहिरेकर यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रगती बागल आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रीती काळे यांच्या उपस्थितीत कारखान्याच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. कारखान्याची संचालक मंडळाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीच बिनविरोध केली होती. त्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचे सर्वाधिकार मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला होता. त्यानुसार राजेंद्र तांबे यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली, तर उपाध्यक्षपदाची जबाबदारी धनाजी अहिरेकर यांच्याकडे देण्यात आली.
मंत्री मकरंद पाटील यांच्याकडून तांबे यांच्या कामाची दखल
यापूर्वी कारखान्याच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना राजेंद्र तांबे यांनी केलेल्या कामाची दखल घेत मंत्री मकरंद पाटील आणि सर्व संचालकांनी त्यांच्यावर अध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली.निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र तांबे म्हणाले की, खंडाळा साखर कारखान्याने एकेकाळी सभासदांचा विश्वास गमावला होता. मात्र, मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील यांनी कारखान्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही साखर कारखाने पुन्हा सुस्थितीत सुरू झाले आहेत.कारखान्यांचे कामकाज योग्य पद्धतीने सुरू असल्याने शेतकरी आणि सभासदांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यात यश आले आहे. या विश्वासाला कोणताही तडा जाऊ न देता कारखान्याचे कामकाज अधिक सक्षम आणि प्रभावीपणे चालविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे तांबे यांनी स्पष्ट केले.
नवनिर्वाचित अध्यक्ष-उपाध्यक्षांचा सत्कार
निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मिलिंद पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र तांबे आणि उपाध्यक्ष धनाजी अहिरेकर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी दत्तानाना ढमाळ, नितीन ओहाळ, शिवाजी खंडागळे, शिवाजीराव शेळके, ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील, संभाजी साळुंखे, गजेंद्र मुसळे, रविराज दुधगावकर, राहुल तांबे, दयानंद खंडागळे यांच्यासह कारखान्याचे संचालक उपस्थित होते.खंडाळा साखर कारखान्याच्या नेतृत्वाची धुरा आता राजेंद्र तांबे आणि धनाजी अहिरेकर यांच्या हाती आली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची प्रगती आणि शेतकरी सभासदांचे हित जपण्याचे मोठे आव्हान असणार आहे.


















