कोल्हापूर : राज्यात यंदाचा ऊस गाळप हंगाम लवकर सुरू झाल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा गाळपाच्या आकडेवारीत मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. २४ नोव्हेंबरअखेर राज्यातील १९१ साखर कारखान्यांनी मिळून तब्बल ३१४.०९ लाख टन उसाचे गाळप केले आहे. गतवर्षी याच कालावधीत १८४ कारखान्यांनी १८९.९६ लाख टन उसाचे गाळप केले होते. म्हणजेच यंदा गाळपात १२४.१३ लाख टनांची, अर्थात सुमारे ६५.३ टक्क्यांची वाढ झाली आहे.
यंदाच्या हंगामाच्या अखेरीस साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी सध्या मात्र साखर उत्पादनाने चांगली आघाडी घेतली आहे. २४ नोव्हेंबरपर्यंत राज्यात २८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गतवर्षी याच कालावधीत १४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. त्यामुळे यंदा साखर उत्पादनात जवळपास दुपटीने वाढ झाल्याचे चित्र आहे.
ऊस तोडणी यंत्रांसह मजुरांकडूनही तोडणीचे काम वेगाने सुरू असल्याने गाळपाचा वेग वाढला आहे. विभागनिहाय आकडेवारीचा विचार करता पुणे विभागाने ऊस गाळप आणि साखर उत्पादनात राज्यात आघाडी मिळवली आहे. मात्र, साखर उताऱ्याच्या बाबतीत कोल्हापूर विभागाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. राज्यात सर्वाधिक १०.०८ टक्के साखर उतारा कोल्हापूर विभागाने नोंदविला आहे.
यंदा गाळप हंगामात सहभागी झालेल्या १९१ कारखान्यांमध्ये ९२ सहकारी आणि ९९ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. गतवर्षी याच तारखेपर्यंत ९२ सहकारी आणि ९२ खासगी अशा एकूण १८४ कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. म्हणजेच यंदा खासगी साखर कारखान्यांच्या संख्येत सातने वाढ झाली आहे.
दरम्यान, राज्यातील साखर कारखान्यांची एकूण दैनिक गाळप क्षमता सध्या १० लाख ४३ हजार ७०० टन इतकी आहे. गतवर्षी याच कालावधीत ही क्षमता १० लाख ६९ हजार ६४० टन होती. त्यामुळे कारखान्यांची संख्या वाढली असली, तरी राज्याच्या एकूण दैनिक गाळप क्षमतेत गतवर्षीच्या तुलनेत घट झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.


















