बीड : ऊस तोडणी व वाहतुकीसाठी घेतलेली उचल रक्कम न परत करता दिलेला धनादेश (चेक) अनादरित झाल्याप्रकरणी, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालयाने आरोपी विलास श्रीमंत भोरे याला ६ मे २०२६ रोजी एक वर्ष सक्तमजुरी आणि १० लाख रुपये दंडाची कठोर शिक्षा सुनावली आहे. आरोपी विलास भोरे याने २००८-२००९ च्या गळीत हंगामात अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्यासोबत ऊस तोडणीचा करार करून ३ लाख ५० हजार रुपयांची उचल घेतली होती.
मात्र, करारानुसार काम पूर्ण न केल्याने व्याजासह ही थकबाकी ४ लाख ९४ हजार रुपयांवर पोहोचली होती. ही रक्कम फेडण्यासाठी आरोपीने २०१३ मध्ये दिलेला धनादेश बँकेत खात्यावर पुरेशी रक्कम नसल्याने ‘बाऊन्स’ झाला. कारखान्याने अॅड. प्रवीण मेटे यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस बजावूनही आरोपीने प्रतिसाद न दिल्याने न्यायालयात धाव घेतली. या खटल्यात कारखान्याच्या वतीने लालासाहेब इंगळे व गोवर्धन पवार यांची साक्ष नोंदविण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुराव्यांच्या आधारे न्यायाधीश गणपा यांनी आरोपीला दोषी ठरवले. न्यायालयाने के सुनावलेल्या १० लाख रुपयांच्या दंडापैकी रक्कम न भरल्यास, आरोपीला अतिरिक्त तीन महिने कारावास भोगावा लागणार आहे.


















