सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळत ऊस बिलाची रक्कम त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली आहे. कारखान्याच्या युनिट क्रमांक १ पिंपळनेर आणि युनिट क्रमांक २ करकंब येथे १ ते १० नोव्हेंबरदरम्यान गाळपासाठी आलेल्या उसाला प्रतिटन ३,१५० रुपये दराने अॅडव्हान्स ऊसबिल अदा करण्यात आले आहे. यासाठी कारखान्याने एकूण ५२ कोटी ४९ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग केले आहेत.
कारखान्याने दर दहा दिवसांनी ऊसबिल देण्याची सुरू ठेवलेली परंपरा यंदाच्या गळीत हंगामातही कायम राखली आहे. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार बबनराव शिंदे यांनी ही माहिती दिली.यंदाच्या गळीत हंगामासाठी जाहीर केल्याप्रमाणे १ ते १० नोव्हेंबर या कालावधीत गाळपासाठी आलेल्या उसाला प्रतिटन ३,१५० रुपये दराने पहिली उचल देण्यात आली आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आली आहे.यापूर्वी अदा केलेल्या ऊसबिलांसह आजअखेर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकूण १३७ कोटी ५९ लाख रुपये अदा केले आहेत, अशी माहिती बबनराव शिंदे यांनी दिली.


















