सांगली : चालू गळीत हंगामात उसाला प्रतिटन ५ हजार रुपये दर द्यावा, तसेच जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांची जिल्हाधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेऊन ऊस दर जाहीर करण्याबाबत निर्णय घ्यावा, या मागणीसाठी उद्या (गुरुवारी) सकाळी ११ वाजता सांगलीत मोर्चा काढण्यात येणार आहे. क्रांतिसिंह नाना पाटील स्मारकापासून या मोर्चाला सुरुवात होऊन तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. आमदार सदाभाऊ खोत यांनी ईश्वरपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
आमदार खोत म्हणाले, “सध्या साखरेचा दर प्रतिकिलो ६५ रुपयांवर पोहोचला आहे. दुसरीकडे, यंदा ऊस उत्पादनात घट झाली असून गळीत हंगामही कमी दिवस चालण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना प्रतिटन ५ हजार रुपये दर देण्यास काय हरकत आहे? मात्र, ऊस दराच्या प्रश्नावर साखर कारखानदार मौन बाळगून आहेत.” ऊस दराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा आणि जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांची एकत्रित बैठक बोलवावी, अशी मागणीही त्यांनी केली.


















