बीड : ऊसतोडीच्या कामासाठी घेतलेली उचल परत करूनही कामावर जाण्यास नकार देणाऱ्या एका मजुराला बळजबरीने पळवून नेण्यात आले. त्यानंतर केज-कळंब महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या मजुराला रुग्णालयात दाखल करण्याऐवजी त्याला रस्त्यावरच सोडून सोबतचे मुकादम पसार झाल्याचा आरोप आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली.
माजलगाव तालुक्यातील गव्हाणथडी येथील रहिवासी नवनाथ नामदेव वायबसे यांनी आगामी ऊसतोड हंगामासाठी घेतलेली ८ हजार रुपयांची उचल परत केली होती. वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी ऊसतोडीच्या कामावर येण्यास नकार दिला होता. मात्र, मुकादम सिद्धेश्वर महादेव चौरे आणि सारंग हनुमंत चौरे यांनी रविवारी, १९ जुलै रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास नवनाथ वायबसे यांना गव्हाणथडी येथून जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नेले. प्रवासादरम्यान नवनाथ यांना जबरदस्तीने दारू पाजण्यात आल्याचा आरोप असून, तिघेही दुचाकीवरून धाराशिव जिल्ह्यातील कळंबच्या दिशेने निघाले होते.
केज-कळंब महामार्गावरील एका हॉटेलजवळ तिघे थांबले असताना नवनाथ वायबसे रस्ता ओलांडत होते. त्याच वेळी भरधाव वेगाने आलेल्या पिकअप वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. त्यानंतर पाठोपाठ आलेल्या प्रवासी टमटमचीही त्यांना धडक बसली. या भीषण अपघातात नवनाथ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते महामार्गावर रक्ताच्या थारोळ्यात पडले.अपघातानंतर सोबत असलेले मुकादम सिद्धेश्वर चौरे आणि सारंग चौरे यांनी जखमी नवनाथ यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याऐवजी घटनास्थळावरच सोडून पळ काढल्याचा आरोप आहे. तसेच, त्यांच्या कुटुंबीयांनाही घटनेची माहिती देण्यात आली नसल्याचे समोर आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी जखमी नवनाथ वायबसे यांना कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.घटनेची गंभीर दखल घेत युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्या पथकाने तातडीने कारवाई करत अपघातग्रस्त दोन्ही वाहने जप्त केली आहेत.याबाबत एपीआय संदीप मांजरमे यांनी सांगितले की, मृत मजुराच्या पार्थिवावर अंत्यविधीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नातेवाइकांच्या फिर्यादीवरून अपहरण, मृत्यूस कारणीभूत ठरणे आणि अपघाताची माहिती न देता घटनास्थळावरून पळून जाणे, अशा गंभीर आरोपांखाली मुकादमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाईल.


















