कोल्हापूर : राज्यातील अनेक भागात, ऊस पिकावर हुमणी किडीचा फैलाव सुरू आहे. हुमणी किडीने प्रादुर्भावग्रस्त झालेला ऊस निस्तेज दिसतो व पाने मरगळतात. हळूहळू पाने पिवळी पडण्यास सुरुवात होते व वीस दिवसांमध्ये संपूर्ण ऊस वाळतो. आणि वाळलेल्या काठीसारखा दिसतो.एका उसाच्या बेटाखाली जास्तीत जास्त २० पर्यंत अळ्या आढळतात. उसाचे एक बेट एक अळी तीन महिन्यांत तर दोन किंवा जास्त अळ्या एक महिन्यात मुळ्या कुरतडून कोरडे करतात. जमिनीखालील उसाच्या कांड्यांनाही अळी उपद्रव करते. या ऊस पिकाचे एकात्मिक किड नियंत्रण करण्याची गरज आहे. हुमणीची बारा महिन्यांत एकच पिढी तयार होत असली, तरी अळीचा जास्त दिवसांचा कालावधी आणि पिकाच्या मुळांवर उपजीविका करण्याची क्षमता यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील डॉ. क्रांती निगडे यांनी दैनिक ‘अग्रोवन’शी बोलताना सांगितले की, हुमणी किडीचा जीवनक्रम अंडी, अळी, कोष व भुंगेरे या चार अवस्थांत पूर्ण होतो. मॉन्सूनच्या पहिल्या सरींनंतर आणि कडुनिंब, बाभूळ, बोर इ. झाडांची पाने खातात नर-मादींचे मिलन होते. त्यानंतर मादी जमिनीमध्ये अंडी घालते. अळी तिसऱ्या अवस्थेतील पूर्ण वाढ झालेली अळी जमिनीत खोल गेल्यानंतर कोषावस्थेमध्ये जाते. अशा पद्धतीने एक पिढी पूर्ण होण्यासाठी एका वर्षाचा कालावधी लागतो. अळी नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्यांचा वापर भुंगेरे गोळा करण्यासाठी करावा. हुमणी नियंत्रणासाठी एकरी एक लिटर ईपीएन प्रति ४०० लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या मुळांशी वाफसा स्थितीत आळवणी केली असता ते प्रभावी ठरते. ईपीएन हे हुमणीचे नैसर्गिक शत्रू असल्यामुळे त्याचा जमिनीतील उपयुक्त जिवाणू, वातावरण, पिकावर, तसेच मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत नाही.


















