नगर : जिल्ह्यातील मुळा, वृद्धेश्वर व ज्ञानेश्वर या तीन साखर कारखान्यांच्या पंचवार्षिक निवडणुकीत मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक इच्छुकांनी अर्ज दाखल केले. लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी शेवटच्या दिवसाअखेर एकुण २४० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर मुळा कारखान्याच्या २१ संचालक पदांसाठी एकूण ९४ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले आहेत. वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत १९ संचालक पदांसाठी एकूण ४४ उमेदवारी अर्ज निवडणूक प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. मुळा कारखान्याच्या निवडणुकीत सत्तारुढ गटाचे अर्ज दाखल करण्यात वर्चस्व आहे तर ‘वृद्धेश्वर’साठी सत्ताधारी राजळे यांच्याविरोधात संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न झाला आहे.
मुळा कारखान्याच्या निवडणुकीसाठी माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील सत्तारुढ गटाकडून ८१ अर्ज दाखल झाले आहेत. तर विरोधी गटात आमदार विठ्ठलराव लंघे गटाकडून केवळ १३ इच्छुकांनीच अर्ज भरल्याचे दिसते. सोसायटी मतदारसंघातून विरोधी गटाचा एकही अर्ज दाखल न झाल्यामुळे माजी आमदार शंकरराव गडाख यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित मानली जाते. इतर मागासवर्गीय व अनुसूचित जाती मतदारसंघ आणि घोडेगाव गटामध्येही विरोधी अर्ज नसल्याने तेथेही बिनविरोधची शक्यता आहे. वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत १९ संचालक पदांसाठी एकूण ४४ उमेदवारी अर्ज निवडणूक प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. सत्ताधारी राजळे गटाविरोधात शिवशंकर राजळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने बिनविरोधच्या आशा मावळल्या आहेत. विद्यमान अध्यक्ष तथा माजी आमदार आप्पासाहेब राजळे, उपाध्यक्ष रामकिसन काकडे यांच्यासह विद्यमान संचालक मंडळातील आमदार मोनिका राजळे यांच्यासह इतरांनी आधीच अर्ज दाखल केले आहेत. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १८ जून आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रसाद मते यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यात तब्बल २४० अर्ज दाखल झाले आहेत.


















